About Us

मुंबई, ही मुंबई कधी कुणाला उपाशी ठेवत नाही, अशी हिची थोरवी आहे. म्हणूनच मुंबईकडे लाखो लोक आकर्षित होतात. राज्याच्या अन्य भागासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे पोट भरण्यासाठी, दोन पैसे मिळवण्यासाठी, नशीब आजमावण्यासाठी येतात. यातून काही स्वतंत्र उद्योग उभारण्याच्या मार्गाला लागतात तर उरलेले नोकऱ्या शोधत वणवण फिरतात. काहींना नशिबाने नोकरी मिळतेही पण, बऱ्याच जणांना आपले गाव बरे असच म्हणाव लागते. या महानगरात इतक्या प्रचंड प्रमाणात व्यापारी उलाढाल होत असताना, सुशिक्षित, अशिक्षित लोकांना नोकऱ्या का नाहीत? महाराष्ट्रातल्या खेडोपाडी राहणाऱ्या मुलांकडे गुणवत्ता असूनही त्यांना रोजगाच्या संधी का मिळत नाहीत? त्यांच्यामध्ये न्यूनगंड का आहे? हेच प्रश्न छपाई तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेल्या एका तरुणाला पडले आणि त्यांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं ठरवले. ती व्यक्ती म्हणजे अनिल फोंडेकर. अनिल फोंडेकर यांनी आपल्या या स्वप्नाला अथक प्रयत्नांनी बळ दिले आणि त्यातून 19 जून 2013 रोजी "महाराष्ट्र रोजगार वृत्त" या वृत्तपत्राचा जन्म झाला. नोकरी हवी असणाऱ्याला नोकरी देऊ इच्छिणाऱ्यांकडे पोहोचवणं हे असिधारा व्रत अनिल फोंडेकरांनी समर्थपणे पेललं. मान्यवरांनी त्यांची या कामाबद्दल पाठ थोपटली. परंतु अनिल फोंडेकर याना खरा आनंद हा महाराष्ट्र रोजगार वृत्तामुळे नोकरी मिळालेल्या नागरिकांकडून मिळाला. आजचा सुशिक्षित तरुण महाराष्ट्र रोजगार वृत्त वाचून आत्मविश्वासानं राज्य आणि केंद्रशासनाच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी तयारी करू लागला आहे. बँका, महानगरपालिका, रेल्वे, खाजगी संस्थांकडे मोठ्या उमेदीने आणि स्वत्वावर विश्वास ठेवत नोकऱ्या मागू लागला. यामध्ये काहीजणांना यशही मिळाले. महाराष्ट्र रोजगार वृत्त हे केवळ नोकरी शोधणाऱ्यांसाठीचं दीपस्तंभ ठरलं नाही. तर, या साप्ताहिकाचे विक्रेते हे देखील त्यावर विश्वास ठेऊ लागले आहेत. अनिल फोंडेकरांनी सुरू केलेला हा उपक्रम आता चांगलाच रूजला आहे. संगणकावर या अंकाची जुळणी करणाऱ्यांपासून ते बातमीदार, वितरणव्यवस्था, प्रशासकीय काम सांभाळणाऱ्या व्यक्ती यांची देखील प्रचंड मदत त्यांना होतेय. जाहिरातदार, वर्गणीदार आणि ग्राहक यांनी महाराष्ट्र रोजगार वृत्ताचं अर्थकारण मजबूत केले आहे. 

या वृत्तपत्रात केवळ शासकीय आणि खाजगी नोकऱ्या उपलब्ध नसून त्या

मध्ये अनिल स्वयंरोजगारआणि त्याच बरोबर उद्योगधंद्याविषयी देखील अधिकाधिक माहिती हि मराठी तरुणांपर्यंत पोहचवली जाते. मराठी माणूस हा केवळ नोकरीमध्ये अडकून न राहता त्यांनी उद्योगधंद्याकडे देखील वळावे या साठी ते नेहमीच कार्यरत असतात. 

आज महाराष्ट्र रोजगार वृत्ताने भविष्यात आणखी ही चळवळ महाराष्ट्राच्या खेडोपाडी पोहोचवण्यासाठी अनिल फोंडेकरांनी कंबर कसलीय. रिकाम्या हातांना काम मिळवून देण्यासाठी त्यांची बोटं आजही तासनतास संगणकाशी खेळ मांडतायत. अनिल फोंडेकरांना ध्यास लागलाय तो सर्वांना रोजगार मिळवून देण्याचा. बातमी आमची प्रगती तुमची हे ब्रीदवाक्य खरं करून दाखवण्याचा...